पुण्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक जिन्नसाचे काही ना काही वैशिष्ट्य असावे लागते. - पुढील अजून कहर - ' येथे सेकंड हँड कवळ्या स्वस्तात मिळतील.'
पुण्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक जिन्नसाचे काही ना काही वैशिष्ट्य असावे लागते.
खजूर सगळ्या महाराष्ट्रात मिळतात, पण ' आमचे येथे रसाळ खजूर मिळतील ' हे फक्त पुण्यात ! एरवी जर्दाळू सगळीकडे, पण ' पौष्टिक जर्दाळू ' फक्त पुण्यात मिळतात.
केशरात ' असली ' केशर फक्त पुण्यात.
सौजन्य म्हणून चहात वेलची घालायची पद्धत उभ्या भारतात असली तरी ' वेलचीयुक्त चहा ' ही पाटी फक्त पुण्यात दिसते.
परवा पेणला गेलो तेंव्हा तिथे पाटी पाहिली ' गणपती कारखाना ', पण तेच पुण्यात बघितले तर ' आमचे येथे पेणच्या सर्वांगसुंदर गणेश मूर्ती मिळतील.'
एकदा अप्पा बळवंत चौकात चालत असतांना ' चातुर्मासानिमित्त उत्कृष्ट प्रतीच्या दासबोधावर पाच टक्के घसघशीत सूट ' अशी पाटी वाचल्यावर उत्सुकतेने दुकानात शिरलो. उत्सुकता ही की उत्कृष्ट प्रतीचा वेगळा काही दासबोध समर्थांनी खास या दुकानाच्या प्रमोशनसाठी लिहिलाय की काय ? चौकशीअंती कळलं की उत्कृष्ट प्रतीचा म्हणजे कापडी बांधणीतला दासबोध ! समर्थ रामदासांच्या नशीबाने मजकुरात बदल नाही.
एका बिल्डरने ' अप्पा बळवंतच्या निसर्गरम्य परिसरात स्वस्तात फ्लॅट मिळवा ' अशी जाहिरात अगदी काल परवा केली होती म्हणे. मला असा विश्वास वाटू लागलाय की जगातील आद्य अँड गुरु हा पुण्याच्या बोहरी आळी ते नागनाथ पार किंवा हिराबाग ते ओंकारेश्वर याच पट्ट्यात कुठेतरी जन्मला असणार.
शनीपाराजवळच्या एका दुकानासमोरच्या पाटीवरचा मजकूर वाचून मी कोलमडायच्याच बेतात होतो. ती पाटी म्हणजे ' येथे टिकाऊ आणि दर्जेदार जानवी जोड मिळतील .'
पुण्यात याचि देही याचि डोळा पाहिलेल्या दोन अविस्मरणीय पाट्या - ' येथे खास मालवणी पद्धतीने केलेले ओरिजिनल चायनीज मिळेल.'
पुढील अजून कहर - ' येथे सेकंड हँड कवळ्या स्वस्तात मिळतील.'
No comments:
Post a Comment