Monday, 23 March 2015

एक संवाद : देवासोबत



 एकदा माझ्या स्वप्नात देव आला,
असतील प्रश्न मनात
 तर विचार म्हणाला...
मनाशीच घातला मी
 माझ्या प्रश्नांचा मेळ,
म्हणालो- "आहेत शंका अनेक
 पण तुला आहे का वेळ ?"
देव हसला... आणि बोलला,
माझा वेळ अमर्याद - अनंत,
विचार मोकळेपणाने ठेवू नकोस
 कुठलीही खंत...
मी म्हणालो-
देवा, मानवी मुल्यांमधे
 काही वाटतो का तुला बदल ?
मानवी जीवनातील कुठल्या गोष्टीबद्दल
 वाटतं का तुला नवल ?
देव म्हणाला-
आहेत अशा गोष्टी अनेक
 तू विचारलं म्हणून सांगतो,
पण विचार कर स्वतःशीच
 का तू मला विचारतो...
माणूस बालपणाला कंटाळतो
 मोठं होण्यासाठी धडपडतो,
अन् मोठा झाल्यावर मात्र
 बालपणच पुन्हा मागतो !!!
धावधाव धावून आरोग्य गमावतो
 पैसा मिळविण्या करीता,
आणि मग पैसाच गमावतो
 आरोग्य राखता राखता !!!
भविष्याबद्दलच्या काळजीने
 माणसाचे मन होते चिंतातूर,
वर्तमान विसरतो आणि जगतो
 सापडत नाही जीवनात सूर !!!
जगण्यासाठी करतो धडपड
 स्मरण त्याला मरणाचं नाही,
मरतो तेव्हा वाटतं की हा
 खरं जीवन कधी जगलाच नाही !!!
होता देवाच्या हाती माझा हात
 मी झालो एकदम स्तब्ध... शांत...
देव म्हणाला - आलं ना लक्षात
 विचार कर जरा निवांत !!!
मी म्हणालो - देवा, आता
 अशी काही शिकवण दे,
जेणे करुन ह्या पामराला
 योग्य मार्ग दिसु दे !!!
देव म्हणाला - हे बघ बाळा
 काही गोष्टी लक्षात ठेव,
मग कुठल्याच बाबतीत
 करावी लागणार नाही उठाठेव !!!
दोन व्यक्तींच्या दोन नजरा
 एकाच गोष्टीकडे वेगवेगळे बघतात,
लक्षात असू दे प्रत्येकाचे
 दृष्टीकोन वेगवेगळे असू शकतात !!!
शिक क्षमा करायला
 अंगी असु दे क्षमाशील वृत्ती,
धरुन बसणे मान - अपमान
 ही नव्हे सत् प्रवृत्ती !!!
झालेल्या चुकांबद्दल एकमेकांना
 माफ करणेच पुरेसे नसते,
स्वतःच्याच चुकांबद्दल स्वतःलाच
 माफ करणेही आवश्यक असते !!!
जखमांवरील खपली काढणे
 हे तर क्षणभराचे काम,
जखम भरून निघायला मात्र
 काळ म्हणतो - "थोडा थांब !!!"
दुसऱ्याशी करणे बरोबरी - चढाओढ
 हे मुळीच योग्य नव्हे,
दुसऱ्या बरोबर स्वतःची तुलना
 म्हणजे स्वतःलाच हीनवणे होय !!!
श्रीमंत माणूस तो नव्हे
 ज्याच्याजवळ आहे खूप,
खरा श्रीमंत आहे तो
 ज्याला मिळते थोडक्यात सुख !!!
करावं तुझ्यावर कुणी प्रेम
 हे तुझ्या हाती नाही,
प्रेमायोग्य स्वतःला बनविणे
 ह्याला काहीच पर्याय नाही !!!
लक्षात ठेव, जगात अशीही काही
 माणसं असतात,
व्यक्त होणं त्यांना येत नसतं
 पण तुमच्यावर अतोनात प्रेम करतात !!!
धन्यवाद देवा ! मी म्हणालो
 सांगितल्या गोष्टी महत्वाच्या खूप,
आणखी काही आहे का ज्याचे
 आहे माणसाला अप्रुप ?
देव हसला... आणि म्हणाला,
सदैव हे लक्षात असू दे...
आहे मी इथेच... कणाकणात...
सत्य हे आपल्या हृदयी वसु दे !!

No comments:

Post a Comment