Monday, 2 March 2015

अर्धनारीनटेश्वर'


शाळेत असताना जेव्हा मी 'अर्धनारीनटेश्वर' चे चित्र पाहिलं तेव्हा खूप संभ्रमावस्थेत गेलो. चित्रातल्याप्रमाणे अर्धा पुरुष+अर्धी स्त्री हे स्वीकारायला मन तयारच व्हायचं नाही.

शालेय जीवनात सर्व निरीक्षण क्षमता बहुधा स्त्री-पुरुषामधली शारीरिक भिन्नता न्याहाळण्यातच जात असावी.

पुढे विविध अनुभवातून स्त्री-पुरुषाची मानसिक जडणघडण समजू लागली.

एकदा प्रशांत या वर्गमित्राच्या घरी वाढदिवसाला गेलो असताना पाहिलं की सगळं काही त्याचे वडीलच करत होते. विचारल्यावर प्रशांतने त्याची आई तो लहान असतानाच वारल्याचे सांगितले. त्यानंतर माझं सगळं लक्ष वडिलांकडे आपोआपच केंद्रित झालं. तेवढ्यात प्रशांत बोलला, "आईची कमतरता कधीही भासू दिली नाही मला बाबांनी."

त्याच क्षणी मला आमच्या शेजारच्या देसाई काकू डोळ्यांसमोर दिसू लागल्या. विधवा झाल्यापासून त्या मुलीला किती जबाबदारीने कसं सांभाळताहेत ते सगळं नजरेसमोर आलं.

मग मनात प्रश्न आला "प्रशांतचे बाबा पत्नी जाण्याच्या आधीपासूनच असे हळुवार होते की पत्नी गेल्यानंतर झाले?" आणि "देसाई काका जाण्याच्या आधीपासूनच देसाई काकू करारी होत्या की काका गेल्यानंतर त्या तशा झाल्या?"

माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आणि प्राकृतिक स्तरावर मनाला न पटलेलं 'अर्धनारीनटेश्वर'चं चित्र जणू माझ्याशी बोलू लागलं.…          

"स्त्री आणि पुरुष यांची शरीरं भिन्न असली तरी प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रीचा अंश आहे तसंच प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुषाचा अंश आहे. हा अंश म्हणजे अवयव नव्हे. तर मानसिकता ! प्रसंगानुरूप पुरुषाच्या अंगातलं स्त्रीत्व हलकेच जागं व्हावं… प्रसंगानुरूप स्त्रीच्या अंगातलं पुरुषत्व सावधपणे जागृत व्हावं… त्यातून सहजीवन अनुभवत असताना किंवा  एकमेकांच्या अपरोक्षही विपरीत परिस्थितीवर मात करत परस्परांच्या जबाबदाऱ्याची पूर्तता व्हावी… या सर्व गोष्टींचं प्रापंचिक स्तरावरचं प्रतीक आहे मी... 'अर्धनारीनटेश्वर'..."

"स्त्रीत्व आणि पुरुषत्व यांचं सुयोग्य संतुलन म्हणजे माणसामधलं देवत्व.… आणि स्त्री-पुरुषाच्या मानसिक मीलनातून दोघांमधलं देवत्व जागं व्हावं हा संदेश देणारं चित्र म्हणजे माझं हे रूप...  'अर्धनारीनटेश्वर'….

No comments:

Post a Comment