. . . . . . . वेळच कुठंय् मला?..............
रात्र सरली, दिवस उगवला, मोबाइलचा अलार्म आरवला,
सुर्यनारायणाचे दर्शन घ्यायला, वेळच कुठंय् मला ?
मुलांना उठवा, डबा करा, बसस्टाॅपपर्यंत सोडवा चला,
गोड गोड पापा मुलांचा घ्यायला, वेळच कुठंय् मला ?
सर्वांच्या नाष्टयाच्या प्लेट भरा, पटकन लागा स्वयंपाकाला,
स्वतःच्या पोटात दोन घास ढकलायला, वेळच कुठंय् मला?
आठ वाजताचा सायरन झाला, उशीरच होतोय आॅफिसला,
आरशात बघून नट्टापट्टा करायला, वेळच कुठंय् मला ?
वेळेत घरी जाण्यासाठी, कामाचा ढीग हवा लवकर उपसायला,
सख्यांशी हितगुज करायला, वेळच कुठंय् मला?
आॅफिस सुटले,बाजारहाट करा, जीव तळमळतोय मुलांना भेटायला,
गाडीच्या ओव्हरस्पीड कडे बघायला, वेळच कुठंय् मला ?
नवऱ्याला चहा, मुलांचा अभ्यास, हवा देवापुढे दिवा लावायला,
संध्याकाळचा वाॅक घ्यायला, वेळच कुठंय् मला?
रात्रीचा स्वयंपाक, उद्याची तयारी, उशीरच होतोय झोपायला,
टिव्ही वरच्या मालिका बघायला, वेळच कुठंय् मला ?
गोल गोल चक्रात अडकलेय मी, गलेलठ्ठ पगार मिळवायला,
मात्र स्वतःसाठी खर्च करायला, वेळच कुठंय् मला?
लहान थोरांच्या दुखण्या-खुपण्याला, रजा लागते आजारपणाला,
स्वतःचीच मात्र काळजी घ्यायला, वेळच कुठंय् मला ?
कधीकधी वाटते, अकस्मात काळ येईल जेंव्हा देवाघरी न्यायला,
जरा थांब त्याला म्हणता, म्हणेल तोही तेव्हा, वेळच कुठंय् तुला?
No comments:
Post a Comment