खरीखुरी लक्ष्मी
--------------एस टी प्रवास करताना एक गोष्ट कॉमन आढळते... बहुतेक ड्रायव्हर तंबाखू खाणारे ! बरं तंबाखू खाण्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही, पण ड्रायव्हिंग करता करता बसल्या बसल्या आपल्या उजव्या बाजूला केबिनमध्येच थुंकणारे ड्रायव्हर पाहिले की माझी सटकते.
असंच एका प्रवासादरम्यान एस.टी. बस प्रवाशांच्या भोजन विश्रामासाठी थांबवली असताना ड्रायव्हरशी उगाचच काहीतरी बोलत मी ओळख वाढवली आणि मग हळूच प्रश्न विचारायला सुरुवात केली.
मी : तुम्हाला दिवाळीत देखिल घरी जायला मिळत नसेल नाही? दिवाळीत घरी लक्ष्मी पूजन कसं काय करता मग?"
ड्रायव्हर : समोर पैसे, दागिने ठेवून करतो आम्ही पूजा. फक्त ती कधी मुहूर्तावर होत नाही इतकंच.
मी : तुमची बायको नोकरी करते का?
तो : नाही.
मी : म्हणजे घरात ज्या लक्ष्मीची पूजा करता ती लक्ष्मी तुम्हीच घरी नेता तर.
तो : व्हय तर.
मी : याचा अर्थ तुमची नोकरी म्हणजे तुमची लक्ष्मी… थोडक्यात काय तर तुम्ही जी एस.टी. बस चालवता तीच तुमची लक्ष्मी. नाही का?"
तो : अगदी बरोब्बर साहेब……
मी : मग त्याच लक्ष्मीच्या अंगावर तंबाखू खाऊन थुंकताना तुम्हाला काही चुकल्यासारखं वाटत नाही का हो ? दिवाळीत लक्ष्मीपूजन कराल तेव्हा तिथे त्या पैशावर असंच थुंकाल का कधी?"
एवढं झाल्यावर मात्र तो काहीही न बोलता उठला, हॉटेलच्या पोऱ्याला म्हणाला, "ए बारक्या, एक बादलीभर पानी आन रे जरा, गाडीची केबिन धुवायचीय."
आणि त्यानं केबिन स्वच्छ केली. पुढच्या आयुष्यात त्यानं काय केलं ते मला माहित नाही, पण तेवढ्यापुरते का होईना मानसिक परिवर्तन झाले हे ही नसे थोडके.
-----------------
लक्ष्मीपूजन म्हणजे वर्षातून एकदा चलनी कागदी नोटा, नाणी, दागिने यांची पूजा करणं नव्हे, तर आपण अर्थार्जनासाठी जे काही काम करतो त्याप्रती वर्षभर श्रद्धा बाळगणं आणि ते काम करण्यासाठी वापरत असलेली आयुधं, जागा इ.विषयी वर्षभर कृतद्न्यतेची भावना जोपासणं
No comments:
Post a Comment