Sunday, 19 April 2015

आठवणीतला "मे" महिना


तुळशीमागला औदुंबर,

ते कौलारु मायेचं घर


कवठीचाफा सोनचाफा..

कर्दळ नी पांढरा चाफा

गावठी गुलाब.. लाल जास्वंद

टप्पोरं जांभूळ, चिकाची करवंदं


कोप-यातलं रायआवळ्याचं झाड

लाड करणारे ते हिरवे हिरवे माड


विहिरीत सोडलेला पोहरा

किंचित कुरकुरणारा रहाट

प्राजक्ताच्या धुंद सड्याने

तेव्हा उगवायची ती पहाट


पिकलेला रायवळ,

झाडावरुन अवचित पडलेला..

रसाळ बरका फणस,

आजोबांनी समोर फोडलेला


हापूस आंब्याचे ते

कपड्यावर डाग पिवळे

गोड गोड पाण्याचे

शुभ्र मलईदार शहाळे


चूलीकडली धग, शेणाचं सारवण

वर्षाच्या बेगमीचं- लाकडाचं सरपण

आजीच्या हातचं माश्याचं कालवण

रसातले शिरवाळे, आंबोळ्या नी घावण


रात्रीच्या अंधारातले आजोबांपुढले पाढे

आजीच्या गोष्टीसाठी मात्र सर्व पुढे पुढे


भावंडांचा धागडधिंगा..

भर ऊनातला तो दंगा 

पत्त्याचा डाव - गुलामचोर नी मुंगूस

चांदण्यारात्री अंगणातला तो धुडगूस


गोटी सोडा कधी लिमलेटची गोळी

आंब्याचे साट आणि फणसाची पोळी


आजीने बोटं मोडत काढलेली दृष्ट,

हळूच दिलेली ती खाऊसाठीची नोट

निघताना आजीचे पाणावलेले डोळे

मुके घेणारे तिचे ते सुरकुतले ओठ


लाल एसटीने निघताना

मागे लाल धुरळा उडवला

आणि तो "मे महिना" आमचा

त्यातच कुठेसा हरवला..

No comments:

Post a Comment