Monday, 2 March 2015

अशी कशी जमते जोडी?


तो आपल्याच विचारात दंग आणि ती असते बडबडी
त्याच्या समोर पुस्तकांचा ढीग अन ती फोनवर गप्पा झोडी
त्याच्या एका शब्दानंतर तिची अख्खी बाराखडी
कळत नाही मला खरच, अशी कशी जमते जोडी?
तिला गाण्याची आवड, तो सोडवतो शब्दकोडी
तिच्या जुगलबंदीच्या गप्पा, त्याला मोबाईल मध्येच गोडी
तिला भीमसेन, कुमार हवे तर त्याला कोळीगीतांची सीडी
कळत नाही मला खरच, अशी कशी जमते जोडी?
मोदक पुरणपोळीचा हात तिचा पण त्याला पुरते भात-कढी
ती खुलते, तो बावरतो पाहुणी येता बडी बडी
आवरून सवरून ती तयार अन त्याच्या पायजम्याची लोम्बतेय नाडी
कळत नाही मला खरच, अशी कशी जमते जोडी?
तो नाटकाची आणतो तिकीट, हातात गजर्याची पुडी
तर घरातला पसारा आवरण्यासाठी ती पदर खोचून खडी
तिच्या हातात झाडू पाहून तो गुपचूप आणतो शिडी
कळत नाही मला खरच, अशी कशी जमते जोडी?
कितीही वेगळे असले तरी परस्परांची ओळखतात नाडी
जमतील तेवढ्या तेही जपतात एकमेकांच्या आवडीनिवडी
जेवणाला नाही का चव आणत साखरेची गोडी आणि लोणच्याच्या फोडी?
म्हणूनच वाटत मला खरच, त्यांची मस्त जमते जोडी!

No comments:

Post a Comment